
बीड, 16 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील हिवरा पहाडी येथे एका अल्पवयीन विवाहीत मुलीला घरातून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी याने पीडितेचे अपहरण करून नदीपात्रात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिला रात्रभर गावच्या चावडीवर बांधून ठेवले. या संतापजनक घटनेची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तपास अधिकारी अतुलकुमार लांडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत. या तपासात पीडितेचा गेल्या वर्षी बालविवाह झाल्याचे उघड झाल्याने, आता तिच्या लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. सध्या आरोपीला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून प्रशासनाकडून तातडीने अहवाल मागवण्यात आला आहे. मानवता कलंकित करणाऱ्या या घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis