
नागरिकांनी मांडल्या पाणी, रस्ता व इतर समस्यांवर तक्रारी
नाशिक, १६ मार्च (हिं.स.) : “शंभर दिवसांचा पाणी दौरा” या उपक्रमांतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात आज सकाळी प्रभाग क्रमांक १, पंचवटी येथून करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, तसेच प्रभागातील नगरसेवक, मनपा अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. पंचवटी प्रभागातील विविध विकासकामांची पाहणी करताना नागरिकांनी पाणीटंचाई, रस्त्यांची खराब अवस्था तसेच इतर नागरी समस्यांबाबत जोरदार तक्रारी मांडल्या. नागरिकांनी आपल्या समस्या लोकप्रतिनिधींसमोर मांडल्यानंतर महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत नागरिकांचा मोठा भ्रमनिरास झाला असून आता लोकनियुक्त प्रतिनिधी आल्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडविणे हे प्राधान्य असल्याचे महापौर हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी सांगितले.नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.-------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV