
बीड, 16 मार्च (हिं.स.)।
परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसराच्या विकासासाठी वैद्यनाथ नीर्थक्षेत्र विकास आराखड्यात आता ३०० कोटी रुपयांपर्यंत वाढ देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेत दिली आहे. यापूर्वी २८६ कोटींच्या आराखड्यास मंजुरी मिळाली होती. यामुळे आता हा आराखडा ३०० कोटींवर गेला आहे.
परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात सुधारित ३०० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला शिखर समितीमार्फत मान्यता देण्याची नक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या आराखड्यातील निधी वाढवून चालू अर्थसंकल्पीय वर्षात अधिक
निधी देण्याची मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या आराखड्यात वाढ करण्याची सूचना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.
सदर आराखड्याअंतर्गत परळीत भक्त निवास उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून दर्शन मंडपाच्या चौथ्या मजल्याचे काम सुरू आहे. त्यामुळे परळी शहरात महाशिवरात्र व श्रावण महिन्यात येणाऱ्या भाविकांची सोय होईल.
प्रवेशद्वाराकडील दगडी पायऱ्या, डोंगर तुकाई स्थानाचा विकास, दगडी प्रवेशद्वारासह अनेक कामे प्रगतिपथावर आहेत.
या निर्णयामुळे वैद्यनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासाला आता अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा भाविकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
----
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis