मेंदूला चैतन्यशील ठेवण्यासाठी ग्रंथांची साथ आवश्यकच : परभणी जिल्हाधिकारी
परभणी, 16 मार्च (हिं.स.)। शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जसे रक्त अत्यावश्यक असते, तसेच मेंदूला चैतन्यशील ठेवण्यासाठी ग्रंथांची साथ आवश्यक असते. वाचनामुळे विचारांना दिशा मिळते, ज्ञानाची कक्षा विस्तारते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. त्यामुळे प्रत्येका
मेंदूला चैतन्यशील ठेवण्यासाठी ग्रंथांची साथ आवश्यकच: जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण


परभणी, 16 मार्च (हिं.स.)।

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जसे रक्त अत्यावश्यक असते, तसेच मेंदूला चैतन्यशील ठेवण्यासाठी ग्रंथांची साथ आवश्यक असते. वाचनामुळे विचारांना दिशा मिळते, ज्ञानाची कक्षा विस्तारते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. त्यामुळे प्रत्येकाने नियमित वाचनाची सवय लावणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

तर, काळानुसार नवे तंत्रज्ञान येतच राहणार; मात्र त्या बदलत्या वातावरणातही वाचनाचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. कारण वाचन माणसाला विचारांनी समृद्ध करते, ज्ञानाची दारे उघडते आणि व्यक्तिमत्त्वाला उंची देते. समाजात वाचन संस्कृती दृढ करण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनाल आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहरातील वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या परिसरात आज दोन दिवसीय परभणी ग्रंथोत्सवाचे उदघाटन प्रा. भालेराव यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी श्री. चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रमास जेष्ठ कवी केशव वसेकर, प्रसिध्द कथाकर राजेंद्र गहाळ, डॉ. धर्मराज वीर, सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, कार्यालय अधीक्षक अनिल बावीस्कर, परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जीवन लोखंडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालासाहेब देवणे आदींसह मोठया संख्येने वाचकप्रेमी, विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, मोबाईलमुळे वाचनाचे माध्यम बदलले असले तरी वाचकांची संख्या कमी झालेली नाही. मात्र काय वाचावे, याचे मार्गदर्शन आजच्या नव्या पिढीला होणे खूप गरजेचे आहे. मोबाईल केवळ मनोरंजनाचे साधन व्हायला नको. त्यात एआयमुळे आता नवे आव्हान उभे ठाकले आहे. या तंत्रामुळे उत्तरे सहज मिळत असले तरी नव कल्पना आणि संशोधनासाठी मानवी मेंदुला सक्रीय ठेवणे कठीण होत आहे. जर मनाच्या आणि मेंदुच्या नैसर्गिक जाणीवा शाबुत ठेवायच्या असतील तर वाचन हे आवश्यकच आहे. शिवाय उपवासाप्रमाणे कोणताही एक पूर्ण दिवस मोबाईल आणि लॅपटॉपपासून स्वत:ला दूर ठेवून वाचनासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणेही गरजेचे आहे. आपले मराठी साहित्य खूप दर्जेदार आहे, आपली भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी हे साहित्य नव्या पिढीने जरुर वाचावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande