
परभणी, 16 मार्च (हिं.स.)।
आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती हे सण-उत्सव जिल्हयातील नागरिकांनी आनंदात व उत्साहात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. सण-उत्सावाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल, संबंधित विभागांचे प्रमुख, समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, अलीकडे हिंदू व मुस्लिम समाजाचे अनेक सण एकत्र येताना दिसत आहेत, हे एक प्रकारे एकात्मतेचे प्रतिकच म्हणावे लागेल. अशावेळी समाजबांधवांनी एकीने शांततेत सण साजरे करावेत. सण साजरे करत असताना कुठेही गालबोट लागणार नाही, अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. जर कुठे अनुचित प्रकाराची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी. पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले की, रमजान ईद, गुढी पाडवा,रामनवमी, महावीर जयंती समाजबांधवांनी सामंजस्याने व आनंदाने साजरे करावी. पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. समाजकंटकांनी सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. समाजमाध्यमांवर पोस्ट करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सामाजिक सलोखा बिघडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मनपा आयुक्त नितीन नार्वेकर म्हणाले की, सण साजरे करताना नागरिकांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि सामंजस्याने सण साजरे करावेत. महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छता व इतर अनुषंगिक बाबींबाबत दक्षता घेतली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis