श्री काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सव
Vasantika Navratri Festival at Shri Kalaram Temple:
Vasantika Navratri Festival


१९ ते २९ मार्चदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

नाशिक, 16 मार्च (हिं.स.)।

: पंचवटी येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या श्री काळाराम मंदिरात यंदा वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असून हा महोत्सव दि. १९ ते दि. २९ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, प्रवचने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक सोहळ्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री काळाराम संस्थानच्या उपस्थित विश्वस्तांनी दिली.

महोत्सवाचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता मंदिर परिसरात होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून धर्मादाय सह आयुक्त, नाशिक उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवाच्या कालावधीत मंदिरात दररोज अभिषेक, विशेष पूजा, सामूहिक रामरक्षा पठण, प्रवचने, कीर्तन, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या रामकाल पथ प्रकल्पाच्या कामामुळे मंदिराचा पूर्व दरवाजा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार असून भाविकांच्या दर्शनासाठी उत्तर दरवाजातून प्रवेश व दक्षिण दरवाजातून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

चैत्र शुद्ध नवमी, दि. २६ मार्च रोजी दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असून त्या दिवशी सायंकाळी श्रींचा अवतरण सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेली श्रीराम रथयात्रा दि. २९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता मंदिरातून काढण्यात येणार आहे. या रथयात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत रामनामाच्या घोषात नगरप्रदक्षिणा काढतात.

महोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून नाशिकसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या पवित्र महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री काळाराम संस्थानचे विश्वस्त शुभम मंत्री, अक्षय कलंत्री, अमित कोठावदे, राघवेंद्र पुजारी व प्रतीक पुजारी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande