
सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)। मागील आठवड्यापासून विमानाने सोलापूरहून गोवा व मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. रविवारी मुंबईस जाणारी फ्लाईट फुल होती. एकच तिकीट शिल्लक होते, ते ४२ हजार रुपयांस विकले गेले. हे आतापर्यंत सर्वाधिक किमतीस विकलेले तिकीट आहे. मागील आठवड्यात मुंबईसाठीचे एक तिकीट २७ हजारास तर गोव्यास जाण्यासाठी १८ हजारास तिकीट विक्री झाले होते. उन्हाळी सुट्या व लग्नसराईमुळे विमानांच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.सोलापूरहून मुंबईसाठी ३ हजार ५०० तर गोव्यासाठी २२०० रुपये तिकीट कंपनीकडून ठेवण्यात आले आहे. मध्यंतरी मुंबईस प्रतिसाद कमी मिळत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत होते. पण आता बारावी, दहावी परीक्षा संपल्यानंतर विमानसेवेसाठी पुन्हा गर्दी वाढली आहे. शिवाय लग्नसराई व विशेष कामांसाठी तातडीने तिकिटांची मागणी वाढली आहे.४२ हजार रुपयांचे तिकीट उड्डाणाच्या आधी चार तास बुक करण्यात आले आहे. तर गोव्यासाठी १८ हजाराचे तिकीट एक याप्रमाणे चार तिकिटे एक दिवस आधी बुकिंग करण्यात आली होती. गोव्यासाठी प्रवाशांचा प्रतिसाद वाढला असून, मुंबईसाठी मागील आठवड्यांपासून ७० टक्क्याहून अधिक प्रवासी वाढले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड