
अमरावती, 16 मार्च (हिं.स.)।
जिल्ह्यातील मेळघाट परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईची समस्या डोके वर काढू लागली आहे. मेळघाटातील मोथा या सुमारे १ हजार ४३३ लोकसंख्या असलेल्या गावात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.गावातील विहिरी व इतर पाणीस्रोत आटू लागल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी अमरावती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सध्या तीन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी नागरिकांना नियोजनबद्ध पाणीवाटपाची अपेक्षा आहे.दरम्यान, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार यंदा अमरावती जिल्ह्यातील सुमारे ५४५ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे प्रशासनाने वेळेवर उपाययोजना करून टँकर, विहिरींचे पुनर्भरण तसेच पर्यायी पाणीपुरवठा योजना राबवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी