
रायगड, 16 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावली असली तरी उन्हाळा सुरू होताच काही भागात पाण्याची चिंता वाढू लागली आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणात सध्या केवळ ५० टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने सुमारे ४० हजार नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उमटे धरण हे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित येते. रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीत १९७८-७९ दरम्यान या धरणाची उभारणी करण्यात आली होती. या प्रकल्पातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा आणि चौल या ग्रामपंचायत क्षेत्रांतील ६५ गावे आणि ३३ वाड्यांतील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.
धरणाची एकूण साठवण क्षमता सुमारे ४० दशलक्ष घनफूट असून, सध्या त्यातील निम्मा साठा शिल्लक आहे. वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी झपाट्याने घटत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एप्रिल-मे महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच पाणी कपात लागू केली आहे.
या निर्णयानुसार संबंधित गावांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून वापरण्याची कसरत करावी लागत आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, गळती रोखावी आणि अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता साहिल आचरेकर यांनी केले आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास उन्हाळ्यातील संभाव्य टंचाईवर मात करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)