
रायगड, 16 मार्च (हिं.स.)। ग्रामीण आणि शहरी भागातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर गंभीर संकटाची छाया निर्माण झाली आहे. या योजनांशी संबंधित तब्बल १३ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, थकबाकी न भरल्यास सुमारे १ हजार ७५ वीज कनेक्शन खंडित होण्याची शक्यता आहे. या कनेक्शनवरच अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महावितरण कंपनीमार्फत जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी, औद्योगिक तसेच विविध सार्वजनिक योजनांना वीजपुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील बहुतांश पाणीपुरवठा योजना विहिरी, धरणे किंवा जलसाठ्यांमधून मोटारींच्या साहाय्याने पाणी उचलून गावांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे या योजनांसाठी अखंडित वीजपुरवठा अत्यावश्यक असतो. मात्र, संबंधित यंत्रणांकडून वीज बिल वेळेत न भरल्यामुळे थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १ हजार ७५ ग्राहकांकडे एकूण १३ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. ही रक्कम तातडीने न भरल्यास संबंधित कनेक्शन तोडण्याची कारवाई होऊ शकते. अशा परिस्थितीत अनेक गावांचा पाणीपुरवठा थेट धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही धरणांमधील जलसाठाही घटू लागला असून सुमारे ५० टक्के साठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. अशा स्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी थकीत वीज बिल तातडीने भरून पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)