
रत्नागिरी, 16 मार्च, (हिं. स.) : खेड तालुक्यात काल रात्रीपासून वेगवेगळ्या चार ठिकाणी आग लागली. त्यात प्राणहानी झाली नसली, तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
खेड शहरातील तांबे मोहल्ला, तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी आणि धामणी या तीन ठिकाणी १५ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून सुरू असलेले अग्नितांडव खेड अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री १ वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न करून आटोक्यात आणण्यात यश मिळवले.
तांबे मोहल्ला परिसरात राहणारे रशीद तांबे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या गोठ्यात पावसाच्या बेगमीसाठी रचून ठेवलेल्या लाकडाच्या माचाला आग लागली. या आगीत संपूर्ण लाकडी माच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. या आगीने पसरत जाऊन बाजूला असलेल्या घराला घेरले आणि या आगीत संसारोपयोगी सर्व वस्तू, साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक भरणे येथील गणेश शिरीषकर यांनीही पाण्याच्या टँकरसह तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला मदत केली.
दुसरी घटना चिंचघर-प्रभुवाडी येथे घडली. विजय शांताराम शेलार यांच्या गोठ्यात सायंकाळी केलेल्या धुराची ठिणगी उडाल्याने पेंढ्याने पेट घेऊन आग लागली. बाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेऊन गोठ्यातील गुरांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवले. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की गोठ्याशेजारी घरेही या आगीच्या लाटेत सापडली असती सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी वेळीच पोहोचून आग आटोक्यात आणली.
तिसऱ्या घटनेत खेड-मंडणगड रस्त्यावरील धामणी येथे गावात आलेल्या देवाच्या पालखीसाठी लावलेल्या फटाक्याच्या माळीतील ठिणगी उडाल्याने शेजारी असलेल्या रमेश रामा कदम यांच्या गुरांच्या गोठ्यावरील पेंढ्यानी पेट घेतला. गावातील ग्रामस्थांनी तातडीने गोठ्यातील गुरांना बाहेर काढून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाचे फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणव घाग, सुरेश शिगवण, चालक गजानन जाधव यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली.
आज (दि. १६ मार्च) दुपारी ३:२५ वाजता शहरातील गुलमोहर पार्क येथील मेहमूद महाडिक मार्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागलेला वणवा विझविण्यातही खेड अग्निशमन दलाने यश मिळविले. या चारही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी