
सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)। दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या सात विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्वसाधारण शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. याबाबत दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम १६ व १७ नुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशक शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आवश्यक सुविधा (रिझनेबल ऍकॉमोडेशन) उपलब्ध करून देणे ही शैक्षणिक संस्थांची जबाबदारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भातील दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांना टप्प्या- टप्प्याने जवळच्या सर्वसाधारण शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच संबंधित शाळांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतही शासन निर्णयानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून या प्रक्रियेला गती देण्यात येणार असून, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड