
चंद्रपूर, 17 मार्च (हिं.स.)। आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश येथील स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक रामनगर पोलिसांनी केला आहे. ३२९ ग्रॅम सोन्याचे दागीन्यासह एकुण ५७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान राकेश मेहडा (२५), कंचन मंडलोही (४०), थानसिंग भुरीया (२६), महेश भुरीया (२५) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चंद्रपूर येथील स्थानिक वडगाव च्या चिंतामणी रेसिडेन्सी येथील रहिवासी असलेले शुभम प्रदीप बारधमवार हे आपले नातेवाईकांच्या लग्न ७ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यक्रमाकरिता राजुरा येथे गेले होते. तिथून दुसऱ्याच दिवशी परतल्यावर त्यांना घराचे समोरील दरवाजाचे कुलूप फोडलेले दिसले. घरात जाऊन पाहणी केली असता घरातील लॉकर तोडून आतमधील सोन्याचे व चांदीचे दाग -दागिने तसेच रोख रक्कम चोरीला नेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले याबाबतची तक्रार त्यांनी स्थानिक रामनगर पोलीस स्थानकात दिली होती.
त्याच दिवशी त्याच घराच्या बाजूच्या सिद्धी अपार्टमेंटमध्ये देखील ज्योती चंदनपाट यांच्या घरी देखील याच पद्धतीने अलमारीतील सोन्याचे दाग- दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलीस ठाणे असे दोन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. घटनास्थळाचे आजूबाजूच्या परिसरातील दहा ते १२ दिवसातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत व तांत्रिक पद्धतीने विश्लेषण करून कौशल्यपूर्ण तपास झाल्यावर सदर आरोपी हे असल्याचे मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील निष्पन्न झाले. त्यांना अटक करण्यासाठी दोन पदके मध्य प्रदेश मध्ये रवाना झाली. तेथून चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात अटक आरोपींना अधिक विचारपूस केली असता त्यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या चार ठिकाणी चोरी करून सोन्याची दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव