
अमरावती, 18 मार्च (हिं.स.) एका व्यक्तीचे एटीएम नजर चुकवून स्वतःजवळ ठेवणाऱ्या व्यक्तीने ५८ हजार ७०० रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. विशेष म्हणजे फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नागपुरी गेट भागातील असमा कॉलनीतील रहिवासी सैयद शौकत सैयद हबीब हे श्याम चौकातील स्टेट बँकेच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले होते. परंतु वारंवार प्रयत्न करून सुद्धा त्यांचे पैसे निघत नव्हते. त्यावेळी त्यांच्या मागे असलेल्या एका व्यक्तीने पैसे काढून देतो, असे सांगून त्यांचे कार्ड घेतले. पण त्यांच्याकडून सुद्धा पैसे निघत नसल्याचे त्याने सांगितले. अखेर सैयद शौकत सैयद हबीब हे तेथून निघून गेले. तीन मार्च रोजी त्यांनी खात्यातील रक्कम तपासली असता त्यात ५८ हजार ७०० रुपये कमी दिसले. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेले एटीएम कार्ड दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून अज्ञात व्यक्तीने विविध एटीएमवरून पाच वेळा दहा हजार रुपये व एकदा ८ हजार ७०० रुपये परस्पर काढून फसवणूक केली. यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
गुंतवणुकीच्या नावावर फसवणूक क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवून एका महिलेची तीन लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची घटना परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पेन्शनपुरा येथील संबंधित महिलेच्या घरी १० ऑगस्ट २०२२ रोजी ती व्यक्ती आली व त्यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास उत्तम परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखविले. विविध वेळी रोख व एनएफटीने रक्कम घेण्यात आली. दोनवेळा प्रत्येकी दहा हजार रुपये कमिशन देण्यात आले. परंतु त्यानंतर फोन उचलणे बंद केले व रक्कम सुद्धा परत केली नाही. त्यामुळे आपली तीन लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची तक्रार महिलेने पोलिसांत केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी