नाशिक ते चाकण हाय-स्पीड पाठलाग, पंजाब-कनेक्टेड ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त
Nashik to Chakan high-speed chase!
नाशिक ते चाकण हाय-स्पीड पाठलाग, पंजाब-कनेक्टेड ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त


नाशिक, 18 मार्च (हिं.स.)

- नाशिकहून चाकणपर्यंत थरारक हाय-स्पीड पाठलाग करत नवी मुंबई पोलिसांनी पंजाबशी संबंधित एक मोठे आंतरराज्य ड्रग्ज व शस्त्रास्त्र रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 82.6 ग्रॅम हेरॉईन, एक ऑस्ट्रियन बनावटीचे ग्लॉक पिस्तूल आणि 1 कोटी 3 लाख रुपये किमतीचा एक ट्रेलर जप्त केला असून अमृतसर, पंजाब येथील 5 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, पंजाबशी जोडलेले काही संशयित अमली पदार्थ व बेकायदेशीर शस्त्रे महाराष्ट्रात पुरवण्याच्या उद्देशाने ट्रेलरच्या माध्यमातून नाशिककडून मार्गस्थ झाले आहेत. या माहितीवर तात्काळ कृती करत पोलिसांनी नाशिकहून त्यांचा पाठलाग सुरू केला. पुणे-नाशिक महामार्गावर वेगाने पळणार्या ट्रेलरचा पाठलाग करत पोलीस पथक अखेर चाकण (जि. पुणे) येथे त्यांना रोखण्यात यशस्वी झाले. वाहन थांबवले असता आरोपींनी प्रतिकार केला; मात्र पोलीस पथकाने कठोर कारवाई करत सर्व पाच जणांना ताब्यात घेतले.

या प्रकरणात नाशिकचे नाव अत्यंत महत्त्वाचे ठरते. पंजाबमधून महाराष्ट्रात येणार्या ड्रग्ज तस्करांनी नाशिककडून मार्ग निवडला होता. नाशिक हे पुणे-मुंबई-औरंगाबाद-नागपूर या सर्व मोठ्या शहरांना जोडणारे महत्त्वाचे महामार्ग केंद्र असल्याने तस्करांसाठी ‘ट्रान्झिट पॉइंट’ म्हणून वापरले जाण्याचा धोका सातत्याने अधोरेखित होत आहे. नाशिक पोलिसांनी 2025 मध्ये वर्षभरात 483 ग्रॅम एमडी व अन्य ड्रग्ज जप्त करून 65 जणांना अटक केली होती. आता पंजाबी हेरॉईन रॅकेटने नाशिकचा वापर मार्गस्थ होण्यासाठी केल्याची ही घटना पोलीस यंत्रणेसाठी नवी चिंता वाढवणारी आहे.

अटक झालेले सर्व 5 आरोपी पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांची नावे व अन्य तपशील तपास प्रक्रियेदरम्यान उघड करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कायदा 1985 अंतर्गत हेरॉईनसारख्या अमली पदार्थांच्या व्यापार व तस्करीसाठी किमान 10 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे हे वेगळे व गंभीर गुन्हे मानले जातात.

पोलिसांनी सांगितले की, या रॅकेटचे अन्य धागेदोरे शोधण्यासाठी तपास जोरात सुरू असून, आरोपींचे पुरवठादार, ग्राहक आणि नेटवर्कशी जोडलेले अन्य सदस्य यांचा शोध घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात ट्रान्झिट पॉइंट म्हणून नाशिकचा वापर होत असल्याने नाशिक पोलिसांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेरॉईन – 82.6 ग्रॅम (बाजारभाव अंदाजे काही लाख रुपये), एक ग्लॉक पिस्तूल आणि एक ट्रेलर जो ड्रग्ज व शस्त्रे वाहतुकीसाठी वापरण्यात येत होता, त्याची अंदाजे किंमत 1 कोटी 3 लाख रुपये आहे. ग्लॉक पिस्तूल हे जगातील सर्वाधिक प्रचलित अर्धस्वयंचलित शस्त्रांपैकी एक असून भारतात बेकायदेशीर मार्गाने येणे अत्यंत गंभीर बाब मानली जाते. पोलिसांनी नाशिककरांसह महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही संशयास्पद वाहन, व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा हेल्पलाइन क्र. 100 वर संपर्क साधावा. ड्रग्जमुक्त नाशिक व महाराष्ट्रासाठी पोलिसांसोबत नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.सध्या नवी मुंबई पोलिसांचे पथक अमृतसर पोलिसांशी समन्वय साधत या नेटवर्कची पाळेमुळे खणून काढण्याचे काम करत आहे. पंजाब-महाराष्ट्र-पाकिस्तान सीमा असा संभाव्य ड्रग्ज पुरवठा साखळीचा तपास सुरू असून, लवकरच अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande