
अमरावती, 17 मार्च (हिं.स.)। चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा येथे सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि मानवतेचा सुंदर संदेश देणारा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. हिंदू नवदाम्पत्याच्या विवाहात मुस्लीम दाम्पत्याने कन्यादान करीत समाजासमोर एकोप्याचा आदर्श ठेवला.
बेलोरा येथील उपवर नितीन आणि मध्य प्रदेशातील माजरी गावातील उपवधू सुनीता यांचा विवाह १४ मार्च रोजी हिंदू रीतीरिवाजांनुसार झाला. आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आदिवासी कुटुंबातील सुनीता हिच्या विवाहासाठी मदतीची गरज होती. ही बाब समजताच मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथील अब्दुल राजिक आणि त्यांच्या पत्नी नाहीद अंजुम यांनी पुढाकार घेत रमजान या पवित्र महिन्यात कन्यादान करण्याचा निर्णय घेतला. विवाहस्थळी हिंदू परंपरेनुसार सर्व विधी करण्यात आले. नववधूचे पूजन, मंगलाष्टक, कन्यादान आणि इतर सर्व धार्मिक विधींमध्ये अब्दुल राजिक व नाहीद अंजुम यांनी पूर्ण श्रद्धेने सहभाग घेतला. त्यांनी कन्यादान करताना नवदाम्पत्याला सुखी संसारासाठी आशीर्वाद दिले. याप्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या दाम्पत्याचे स्वागत केले.
विवाह सोहळ्यासाठी शिरसगाव कसबा येथील अब्दुल शहजाद, धनराज ठाकरे, प्रमोद ठाकरे, कबीर तायडे, विवेक गुल्हाने आणि पंकज मिश्रा यांनीही आर्थिक व प्रत्यक्ष मदतीचा भरीव हात दिला. विवाहासाठी आवश्यक साहित्य, पाहुणचार आणि व्यवस्थापनात सर्वांनी मनापासून सहकार्य केले. त्यामुळे हा विवाह केवळ दोन कुटुंबांचा नव्हे, तर सामाजिक ऐक्याचा उत्सव ठरला. सरपंच भैयासाहेब कडू यांनी याला मानवतेचा सण असे संबोधले.
यासंदर्भात बेलोराचे ग्रामस्थ अब्दुल राजिक यांनी सांगितले की, मुलगी ही सर्वाचीच असते, तिच्या संसारासाठी हातभार लावणे हीच खरी समाजसेवा. धर्म वेगळे असले, तरी माणुसकी सर्वात मोठी आहे. एका मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी मदत करणे हे माझे कर्तव्य मानले. पत्नी नाहीद अंजुम यांनीही समर्थ साथ दिल्याने एक पुण्यकर्म घडून आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी