
अमरावती, 17 मार्च (हिं.स.) : नगरपालिकेचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी शहरातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी मोहीम हाती घेतली असून, त्याचाच भाग म्हणून सर्वात जुनी ‘किल्ला’ शाळेला त्यांनी अचानक भेट दिली. यावेळी शाळेतील अस्वच्छ, दुर्लक्षित अवस्था पाहून संतापलेल्या नगराध्यक्षांनी कठोर कारवाई करत संबंधित शिक्षकांची एक पगारवाढ रोखण्याचे आदेश दिले.तर
मुख्याध्यापकांच्या खोलीत सापडल्या गुटख्याच्या पुड्या पाहून आचर्य चकित झाले.
नगरपालिकेअंतर्गत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत मराठी व उर्दू माध्यमाच्या एकूण ९ प्राथमिक शाळा असून मराठी व उर्दू माध्यमाच्या दोन माध्यमिक शाळा आहेत. तसेच एक विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजही शहरात कार्यरत आहे. शहरातील नगरपालिकेच्या शाळांमधून अनेक मोठे अधिकारी घडल्याचा इतिहास असला, तरी काही वर्षांपासून शाळांची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र आहे.वर्गखोल्यांच्या कोपऱ्यात कचऱ्याचे ढिग दिसत होते. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी जनावरेही राहू शकणार नाहीत, अशा अस्वच्छ जागी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात असल्याचेही दिसून आले. ही अवस्था पाहून नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ सूचना देऊन न थांबता नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी स्वतः नगरसेवकांसह हातात झाडू घेऊन संपूर्ण शाळा व वर्गखोल्या स्वच्छ केल्या. त्यानंतर अस्वच्छता व कामातील हलगर्जीपणाबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांची एक पगारवाढ रोखण्याचा शेरा शेरेबुकात नोंदवत प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना तसे आदेश दिले. पुढील काळात नगरपरिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांची पटसंख्या किमान पाच पटीने वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही नगराध्यक्ष याप्रसंगी म्हणाले.यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून शाळेतील कचरा स्वच्छ केला. वर्गखोल्यांमधून दीड ट्रॉली कचरा बाहेर निघाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अशा परिस्थितीत कसे सुरू होते, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी नगराध्यक्षांनी यापूर्वी वाशीम जिल्ह्यातील साखरा येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेला भेट दिली होती. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी माजी प्राचार्य रवींद्र कोकाटे, विनोद हाडोळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप कावलकर, गोपाल वानखडे,मो. नईम यांचे मार्गदर्शनही घेतले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्याध्यापकांच्या खोलीत सापडल्या गुटख्याच्या पुड्या ः
किल्ला शाळेच्या भेटीदरम्यान नगराध्यक्ष गायगोले यांना अनेक धक्कादायक बाबी आढळल्यात. मुख्याध्यापकांच्या खोलीत गुटख्याच्या पुड्या सापडल्या, तर विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत गाळ साचलेला होता. महापुरुषांचे फोटो धुळीत माखलेले होते, तर विद्यार्थ्यांना वाटपासाठी ठेवलेली सुमारे ४०० ते ५०० प्रमाणपत्रे निष्काळजीपणामुळे खराब झाली होती. शासनाकडून दिलेले संगणक, मोठ्या स्क्रीनचा टीव्ही व ऑनलाइन शिक्षणाचे साहित्य वापराविना धूळ खात पडले होते. विद्यार्थ्यांसाठी आलेले नवीन टेबल-बेंच एका बंद खोलीत ठेवून दिले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी