अमरावती - जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन स्पेशल वॉर्ड
अमरावती, 17 मार्च (हिं.स.) विदर्भातील उकाड्यात तसेच तापमानात सातत्याने वाढ होत असून पुढील काही दिवस ‘हीट वेव्ह’चा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्
जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन स्पेशल वॉर्ड ः आरोग्यकेंद्रावर उपाययोजना


अमरावती, 17 मार्च (हिं.स.)

विदर्भातील उकाड्यात तसेच तापमानात सातत्याने वाढ होत असून पुढील काही दिवस ‘हीट वेव्ह’चा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र तीन वॉर्ड सुरू करण्यात आले असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्यकेंद्रस्तरावर सुद्धा कुठल्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या उन्हाचा पारा ४० अंशापार झालेला असून रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट दिसून येतो. संभाव्य उष्माघाताचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरवात झाली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका सुद्धा वाढला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉर्ड एक महिलांसाठी, वॉर्ड सहा पुरुषांसाठी तर वॉर्ड क्रमाांक पाचमध्ये लहान मुलांवर उपचार केले जातील. याशिवाय ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्यकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सुद्धा उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी व्यवस्था करण्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रे तसेच उपकेंद्र स्तरावर स्वतंत्रपणे उष्माघात वॉर्ड सुरू करण्यात आला असून त्याला कोल्ड रूमचे स्वरूप देण्यात आले आहे. शिवाय आवश्यक असलेला औषधीसाठा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिल्ह्याची स्थिती एकुण तालुके - १४, प्राथमिक आरोग्य केंद्र ः ५९ आरोग्य उपकेंद्र ः३३९ आरोग्य पथक ः१२ एकुण गावे : १६६३ वैद्यकीय पथक : १४ जिल्हास्तरावर एक पथक

उष्माघातापासून संरक्षणासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. उपचारासोबतच जनजागृती आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. -डॉ. प्रवीण पारिसे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande