
जळगाव, 17 मार्च, (हिं.स.) यावल वनविभागाच्या पथकाने सातपुडा पर्वतरांगांतील वाघझिरा नियतक्षेत्रात वणवा लावणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ अटक केली आहे. झेंडी, यावल येथील रहिवासी राज्या सखाराम बारेला हा वाघझिरामधील कक्ष क्रमांक १४९ मध्ये प्रत्यक्ष वणवा लावत असताना वन पथकाने ताब्यात घेतला.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने सातपुडा परिसरातील वाघझिरा राऊंड अंतर्गत परिमंडळ वाघझिरा, नियतक्षेत्र मनुदेवी कक्ष क्रमांक १४९ येथे तपासणी केली. या वेळी विविध ठिकाणी वन-वणवा लावलेला आढळून आला.
पथक घटनास्थळी पोहोचले असता आरोपी राज्या सखाराम बारेला हा प्रत्यक्ष वणवा लावताना दिसून आला.त्याला न्यायालयाने वन कोठडी सुनावली आहे. पथकाने तत्काळ जंगलात लागलेला वणवा विझवून मोठा अनर्थ टाळला.ही कारवाई यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक सौरिष सहाय, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील आणि वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिमंडळ अधिकारी विपुल पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवणे, अशोक राठोड, रतन शेलार, जगदीश बारेला आणि इतर वनसेवकांच्या तत्परतेमुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान टळले. सातपुडा परिसरातील वाढत्या तापमानामुळे वणव्याचा धोका वाढलेला आहे. यावरून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा घटनांची तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर