
रायगड, 18 मार्च, (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात नवीन मराठी वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू असून गुढीपाडव्याचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहताना दिसत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा (दि. १९ मार्च) निमित्त जिल्हाभरात शोभायात्रा, रॅली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली असून झेंडूची फुले, साखरमाळा, गुढीच्या काठ्या, नक्षीदार कापड, नारळ, आंब्याची पाने आदी साहित्याला मोठी मागणी आहे. तयार गुढ्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत असून व्यापाऱ्यांनी विविध सवलती जाहीर केल्याने उलाढालीत वाढ झाली आहे.
दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपत असल्याने तसेच सलग सुट्ट्यांचा फायदा घेत अनेक पर्यटक रायगडात दाखल होत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवरही गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जात असल्याने गृह, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन तसेच सोने-चांदी खरेदीला नागरिक प्राधान्य देत आहेत. सराफा बाजारातही मोठी उलाढाल अपेक्षित असून विविध ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्याने एसी, फ्रीज, कूलर, फॅन यांची मागणीही वाढली आहे.
स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक सवलतींसह स्मार्टवॉच, नेकबँडसारख्या भेटवस्तूंची ऑफर देण्यात येत आहे, त्यामुळे ग्राहकांचा उत्साह आणखी वाढला आहे.द रम्यान, अलिबागमध्ये गुढीपाडवा निमित्त २५ रॅली, शोभायात्रा व मिरवणुका आणि ५ इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १० ते १५ हजार नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
या बंदोबस्तात ७५ पोलिस अधिकारी, ६६५ अंमलदार, ३ RCP, १ QRT, ५ स्ट्रायकींग युनिट आणि ६५ वाहतूक अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
नवचैतन्य, परंपरा आणि उत्साह यांचा संगम असलेला गुढीपाडवा साजरा करण्यासाठी रायगडकर सज्ज झाले असून संपूर्ण जिल्हा सणाच्या रंगात रंगून गेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)