
कोल्हापूर, 18 मार्च (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभु श्रीराम आणि हिंदू संस्कृतीसंबंधी वादग्रस्त विधानं करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हिंदु जनजागृती समितीने केला आहे.
हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे की, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भात आव्हाड यांनी अत्यंत खोटारडे, खालच्या पातळीवरील आणि जातीयतेवर आधारित विधानं केली आहेत. समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारकी हटवण्याची, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि चुकीचा इतिहास पसरवल्याबद्दल कठोर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांनी स्वीकारले. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, महाराजा प्रतिष्ठानचे निरंजन शिंदे, मंदिर महासंघाचे अशोक गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे रामभाऊ मेथे, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, ‘मराठा तितुका मेळवावा’चे योगेश केरकर, हिंदू महासभेचे मनोहर सोरप, भाजपचे एस.बी. देवणे, हिंदू महासभा शहराध्यक्षा पूजा शिंदे, हिंदुत्वनिष्ठ प्रकाश घाटगे, शशिकांत बीडकर आणि दीपक हारूगडे उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त विधानांचे ठळक मुद्दे:
तुम्ही औरंगजेबाला इतिहासातून काढू शकत नाही. औरंगजेबाला काढलं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना समजवू शकत नाही.
छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे फोडले, त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं.
मोगलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार, मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले असे दाखवणार? समोर औरंगजेब आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना?
राम आमच्या बहुजनांचा आहे, शिकार करून खाणारा राम मांसाहारी होता, असे प्रभु श्रीरामांविषयीही त्यांनी अपमानजनक विधान केले.
समितीने असे विधान केले की, या वादग्रस्त वक्तव्यांमुळे समाजात धार्मिक भावनांची दुःखःजनक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या प्रकरणाची योग्य तक्रार दाखल करण्याची आवश्यकता आहे.--------------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar