
परभणी, 18 मार्च (हिं.स.)। परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी कायम राहिली असून अध्यक्षपदी लता विजयकुमार वाकळे तर उपाध्यक्षपदी श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या असलेल्या लता वाकळे या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून अध्यक्षपदी विराजमान झाल्या. तर सोनपेठ तालुक्यातील शेळगाव गटाचे सदस्य श्रीकांत विटेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपाध्यक्षपदी निवड झाली.
दरम्यान, या निवडणुकीत राजकीय वादही उफाळून आला. शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेला फसवल्याचा आरोप केला आहे. उपाध्यक्ष पद शिवसेनेला देण्याचे पूर्वी मान्य करूनही ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला पद देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त करत शिवसेनेने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. या घडामोडींमुळे जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणांवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis