
रायगड, 18 मार्च, (हिं.स.)। श्रीवर्धन तालुक्यातील कोंडीवली आणि आरावी समुद्रकिनाऱ्यावर प्रथमच ‘ऑलिव्ह रिडले’ कासव संवर्धन उपक्रम राबवण्यात आला असून अवघ्या काही दिवसांत तब्बल ११३ पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मार्चदरम्यान झालेल्या या उपक्रमामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेला हा उपक्रम रायगडसाठी ऐतिहासिक ठरला आहे. वन परिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळवन कक्ष व ग्रामपंचायत खारगाव यांच्या पुढाकारातून हे संवर्धन यशस्वी झाले. कासव मित्र, वनरक्षक आणि स्थानिक नागरिकांनी रात्रंदिवस गस्त घालत अंड्यांचे संरक्षण केले.
विशेष म्हणजे, कासवांनी किनाऱ्यावर अंडी घातल्यानंतर ती सुरक्षित ठिकाणी हलवून नैसर्गिक हॅचरीमध्ये ठेवण्यात आली. कुत्रे व वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी बांबूच्या टोपल्यांचा वापर करण्यात आला. सुमारे ४५ ते ६० दिवसांच्या कालावधीनंतर अंड्यांतून बाहेर पडलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.
हा उपक्रम भविष्यात पर्यटनासाठी मोठे आकर्षण ठरणार असून ‘कासव महोत्सवा’ची संकल्पनाही पुढे येत आहे. कोंडीवली–आरावी किनाऱ्याला यामुळे नवी ओळख मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, वन विभागाने नागरिक व पर्यटकांना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. प्लास्टिक कचरा टाळून कासवांच्या संवर्धनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी केले आहे.
रायगडमध्ये पहिल्यांदाच घडलेल्या या उपक्रमामुळे निसर्गसंवर्धनाचा नवा आदर्श निर्माण झाला असून स्थानिकांच्या सहभागामुळेच हा ‘जीवनोत्सव’ शक्य झाल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)