नंदुरबारमध्ये ‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू होणार
नंदुरबार, 18 मार्च (हिं.स.) । राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने “मिशन लक्षवेध” हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या य
नंदुरबारमध्ये ‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू होणार


नंदुरबार, 18 मार्च (हिं.स.) । राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने “मिशन लक्षवेध” हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

या योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी ऍथलेटिक्स आणि हॉकी या दोन क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली असून, जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र (DSTDC) उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली आहे.केंद्राचे स्वरूप अनिवासी असेल आणि ती प्रामुख्याने जिल्हा किंवा विभागीय क्रीडा संकुल परिसरात सुरू केली जातील. ज्या ठिकाणी ही सोय उपलब्ध नसेल, तिथे शासकीय, निमशासकीय किंवा अपवादात्मक परिस्थितीत खाजगी संस्थांच्या संकुलामध्ये केंद्र उभारले जाईल.

निवडीसाठी निकष:-

वयोमर्यादा:- 31 डिसेंबर पर्यंत 21 वर्षांखालील मुले व मुली.

अधिवास:- खेळाडू महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक.

क्रीडा कामगिरी:- किमान राज्यस्तरावरील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू (शालेय किंवा अधिकृत क्रीडा संघटना स्पर्धा).

वैद्यकीय तपासणी:- शासनमान्य डॉक्टरांकडून दिलेले वैध फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे: -जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, गेल्या दोन वर्षांची क्रीडा कामगिरी प्रमाणपत्रे, पासपोर्ट साईजचे 03 फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि पालकांचे संमती पत्र.

अर्ज कसा करावा:- इच्छुक आणि पात्र खेळाडूंनी आपले अर्ज 02 एप्रिल 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जमा करावेत.

अधिक माहितीसाठी, राज्य क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार यांच्याशी 9850559509 वर संपर्क साधावा.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन आपले क्रीडा कौशल्य विकसित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी केले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande