रत्नागिरी : ‘सहकार स्वरूपा’ म्हणजे कोकणातील सहकाराचे अनुभवसिद्ध मॉडेल : उदय निरगुडकर
रत्नागिरी, 18 मार्च, (हिं. स.) : सहकार चळवळ समाजाच्या पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या घटकांना आत्मविश्वास देण्याचे काम करते. सहकार म्हणजे आधुनिक भारताचे लक्ष्मीसूक्त असून, ‘सहकारातून समृद्धीकडे’ हे भारताच्या अंत्योदयाचे सूत्र आहे. ‘सहकार स्वरूपा’ हे पु
उदय निरगुडकर


सहकार स्वरूप पुस्तक


रत्नागिरी, 18 मार्च, (हिं. स.) : सहकार चळवळ समाजाच्या पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या घटकांना आत्मविश्वास देण्याचे काम करते. सहकार म्हणजे आधुनिक भारताचे लक्ष्मीसूक्त असून, ‘सहकारातून समृद्धीकडे’ हे भारताच्या अंत्योदयाचे सूत्र आहे. ‘सहकार स्वरूपा’ हे पुस्तक अॅड. दीपक पटवर्धन यांच्या ३५ वर्षांच्या संघर्षाची गाथा असून, कोकण ही सहकाराची भूमी आहे हे त्यांनी आपल्या वाटचालीतून सिद्ध केले आहे. अॅड. पटवर्धन यांनी सहकारासह ज्या क्षेत्रांत काम केले, तिथे त्यांनी अडचणी सोडवण्याचेच काम केले. त्यामुळे ‘सहकार स्वरूपा’ म्हणजे कोकणात राहून उत्तम काम करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणारे एक अनुभवसिद्ध पुस्तक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आणि ख्यातनाम वक्ते डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पतसंस्था, वाचक चळवळ आणि राजकारण या क्षेत्रांमध्ये केलेल्या मुशाफिरीवर आधारित असलेल्या ‘सहकार स्वरूपा’ या पुस्तकाचे प्रकाशन १७ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी रत्नागिरीत डॉ. निरगुडकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी अॅड. पटवर्धन यांच्या कार्याचे कौतुक करून, ‘सहकार स्वरूपा’ पुस्तकाचे वेगळेपण आणि महत्त्व यांविषयी विवेचन केले. प्रसिद्ध लेखक सुमेध वडावाला-रिसबूड यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले असून, प्रतिष्ठित अशा राजहंस प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे. प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संपादक आणि चतुरस्र वक्ते डॉ. उदय निरगुडकर यांच्यासह स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे उपाध्यक्ष संतोष प्रभू, रत्नागिरी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे आणि रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे निवृत्त कार्यक्रम अधिकारी सुहास विद्वांस उपस्थित होते.

डॉ. निरगुडकर यांनी या वेळी सहकार चळवळ देशाच्या प्रगतीसाठी कशी आवश्यक आहे हे अनेक उदाहरणांनी विशद केले आणि अॅड. पटवर्धन यांच्या कार्याचे महत्त्वही अधोरेखित केले. ते म्हणाले, सहकाराची चळवळ मजबूत होत नाही, तोपर्यंत देशाला विश्वगुरू बनता येणार नाही. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे भारतीय संस्कृतीचे तत्त्व सहकार चळवळीतही आहे. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, की ‘सरकार चालवताना एक डोळा शेतीवर आणि एक डोळा उद्योगावर, तर नाक सहकारावर असले पाहिजे.’ सहकार हे महाराष्ट्राचे नाक आहे आणि त्या नाकातील नथ म्हणजे स्वामी स्वरूपानंद पतसंस्था. बँकेचे काम संपते, त्याच्या खूप आधी आणि खूप नंतर पतपेढ्यांचे काम चालते. सरकारही सहकारी क्षेत्रासाठी बरेच काही करते आहे. भारताने आयोजित केलेल्या जागतिक सहकार परिषदेत १०० उत्तम प्रकल्प मांडण्यात आले होते. चढ-उतार येत असतात; मात्र आपल्या ग्रामीण भागात सहकाराच्या जाळ्याची ताकद असल्याने आपण मोडून पडणार नाही. आपल्याकडे कम्युनिझम रुजत नाही, रुजणार नाही. कारण ‘कमाएगा वो खाएगा’ हे कम्युनिझमचे सूत्र आहे; मात्र ‘कमाएगा वो खिलाएगा’ ही आपली संस्कृती आहे.

डॉ. निरगुडकर म्हणाले, समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन समाजाच्या गरजा भागवण्याकरिता सुरू केलेली चळवळ म्हणजे सहकार. त्यात प्रतिस्पर्धी नसतो, तर सहकारी असतात; मात्र दुर्दैवाने आपल्याकडे राजकीय सोपान चढण्याची पायरी म्हणून सहकाराकडे पाहिले जाते. सहकार आणि राजकारण यांच्यातील अंतर कमी झाले आणि सहकार व राजकारण एकत्र आले, तर फक्त वैयक्तिक प्रगतीसाठी काम केले जाते. म्हणूनच नेतृत्वाची नीतिमत्ता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यातूनच ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होतो आणि एकदा ग्राहकाचा विश्वास मिळवला की जगातील कोणतीही डिस्काउंट स्कीम तो विश्वास तोडू शकत नाही, हे अॅड. पटवर्धन यांच्या उदाहरणावरून कळते. सहकार क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी होती; मात्र कोकणातही सहकार चांगला फोफावू शकतो हे अॅड. पटवर्धन यांनी दाखवून दिले. त्रस्त, व्यस्त, सुस्त, स्वस्थ अशा प्रकारची माणसे असतात; मात्र दीपक पटवर्धन हे त्यापेक्षा वेगळे असून, ते समस्या ओळखून त्यावर उपाय शोधणाऱ्या मस्त प्रवृत्तीचे व्यक्तिमत्त्व आहे. पत्नी अरुणाताई यांनी त्यांना दिलेली साथही तितकीच मोलाची आहे. यश आणि प्रसिद्धी कोणत्या मार्गाने मिळवली जाते हे महत्त्वाचे असून पटवर्धन यांनी नैतिकतेचे भान कायम ठेवले आहे. राजकारणात रमण्यापेक्षा समाजासाठी केलेले त्यांचे कार्य अधिक चिरस्थायी आहे.

कोकणात वाढत्या वृक्षतोडीमुळे डोंगर बोडके होत आहेत. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून वनराया आणि देवराया उभ्या करण्याची गरज आहे, असे मतही डॉ. निरगुडकर यांनी व्यक्त केले.

या वेळी संतोष थेराडे यांनी अॅड. पटवर्धन यांच्या संस्थात्मक कार्याचा आढावा घेऊन डॉ. निरगुडकर यांचा परिचय करून दिला आणि मान्यवरांचा सत्कार केला. अॅड. पटवर्धन यांच्या सूनबाई सौ. अंकिता वैभव पटवर्धन यांनी सांगितले, की बाबांच्या आत्मकथनाचा हा सोहळा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. संघर्षातून यश मिळवून इतरांना प्रेरणा देणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे.

सुहास विद्वांस म्हणाले, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचा केवळ दहा हजार रुपयांपासून सुरू झालेला प्रवास आज सातशे कोटींपर्यंत पोहोचला आहे. कोकणात सहकाराची पायाभरणी करणारे दीपक पटवर्धन हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व आहे. संस्थेत सोनेतारणासाठी स्वतंत्र कक्ष ठेवणे ही संवेदनशीलता हे त्यांचे वेगळेपण आहे. ठेवीदारांच्या पैशांची काटेकोरपणे काळजी घेणारे असे नेतृत्व दुर्मीळ असते.

सहकार क्षेत्रात मोठ्या संधी असून उद्योजकतेसाठी व्यापक जाळे उपलब्ध आहे. कोकणातील युवकांनी सहकाराकडे नव्या दृष्टीने पाहावे, असे आवाहन अॅड. पटवर्धन यांनी केले. ते म्हणाले, माझा ३५ वर्षांचा प्रवास या पुस्तकातून शब्दबद्ध झाला आहे. मला अनेक ठिकाणी आणि प्रामुख्याने सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. कोकणामध्ये सहकार क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकदा नकारात्मक असतो. अशा परिस्थितीत केवळ १० हजार रुपये हातात असताना केलेली सुरुवात आज ७०० कोटी रुपयांपर्यंत नेता आली. ३०० सभासदांच्या एका छोट्या ग्रुपपासून सुरू झालेला हा प्रवास ४९ हजार सभासदांपर्यंत पोहोचला आहे. रत्नागिरी तालुक्यापुरते मर्यादित असलेले स्वरूपानंद पतसंस्थेचे कार्यक्षेत्र आज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे. ज्या हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये मी केवळ ७०० रुपयांवर काम केले, त्याच संस्थेचा १० वर्षे संचालक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. हे सांगण्याचा उद्देश हाच आहे, की सहकार क्षेत्रात नेतृत्व आणि उद्योजकतेच्या खूप मोठ्या संधी दडलेल्या आहेत. कोकणातील तरुणांनी या संधी साध्य कराव्यात, यासाठी माझ्या अनुभवांचे कथन या पुस्तकात केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande