परभणी : आत्मविश्वास, कष्ट आणि योग्य दिशा असेल तर यश निश्चित – जिल्हाधिकारी
परभणी, 18 मार्च, (हिं.स.)।स्वतःवरचा आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी आणि योग्य दिशा मिळाली तर जीवनात हमखास यश मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. ते येथील शारदा महाविद्यालय येथे आयोजित पदवी वितरण समारंभात बोलत होते. स
आत्मविश्वास, कष्ट आणि योग्य दिशा असेल तर यश निश्चित – जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण


परभणी, 18 मार्च, (हिं.स.)।स्वतःवरचा आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी आणि योग्य दिशा मिळाली तर जीवनात हमखास यश मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. ते येथील शारदा महाविद्यालय येथे आयोजित पदवी वितरण समारंभात बोलत होते.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि शारदा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. बी.ए., बी.कॉम., बी.एससी., बी.सी.ए., तसेच एम.ए. (मानसशास्त्र व उर्दू) या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी चव्हाण म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांसमोर नवे अभ्यासक्रम आणि आव्हाने उभी आहेत. अशा वेळी श्रमाची लाज न बाळगता नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. मोबाईल हा दुधारी शस्त्र असल्याने त्याचा योग्य वापर करून ज्ञान मिळवावे, मात्र अतिवापर टाळून मानसिक स्वास्थ्य जपावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच मैदानी खेळ व सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बबन पवार होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ ध्वज रॅलीने झाली. त्यानंतर विद्यापीठ गीत, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande