
रत्नागिरी, 18 मार्च (हिं.स.) : कोकण भूमी कृषि पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीने गोळवली (ता. संगमेश्वर) येथील राई कृषि व निसर्ग पर्यटन केंद्र मध्ये फळप्रक्रिया उद्योग कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत काजूपासून वाइननिर्मितीसह विविध फळप्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मीनल ओक यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष नंदादीप पालशेतकर यांनी मार्गदर्शक माधव महाजन आणि दीप्ती लाड यांचा परिचय करून दिला.प्रशिक्षणार्थी अहमदनगर, नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई, हरिहरेश्वर, दापोली, मंडणगड, रत्नागिरी, सावंतवाडी, म्हापसा (गोवा) यासह विविध ठिकाणांहून आले होते, एकूण ४२ सहभागी झाले. सहभागी प्रशिक्षणार्थींनी आपल्या उद्योग व शेतीसंबंधित अनुभव शेअर केले.. दीप्ती लाड यांनी काजूबोंडापासून काजू खजूर (कँडी) आणि काजू सरबत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. माधव महाजन यांनी विविध स्थानिक फळांच्या रसापासून तयार होणाऱ्या वाइनचे प्रात्यक्षिक करून त्याची पोषणमूल्ये सांगितली. प्रशिक्षणार्थींना काजू खजूर व सरबताचा आस्वाद घेता आला.
या उपक्रमासाठी संस्थेचे सदस्य राम रेडीज यांनी आपल्या बागेतील काजूबोंडे उपलब्ध करून दिली. सचिव अमोल लोध यांनी राई कृषि पर्यटन केंद्रामध्ये उत्तम व्यवस्थापन केले.उपस्थितांमधून श्रीकांत वैद्य आणि अरविंद टिपले यांनी मनोगत व्यक्त केले. आदिवासी समाजातील दोन प्रशिक्षणार्थी अहमदनगर आणि अकोल्याहून आले होते आणि त्यांनी आपल्या वन्यजीवन अनुभवांचे कथन केले.प्रशिक्षणार्थींनी निसर्गाच्या सान्निध्यात, वृक्षांच्या छायेत, शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून काजू प्रशिक्षणासह भोजनाचा आस्वाद घेतला. श्रीकांत वैद्य, माधव महाजन आणि अमोल लोध यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रकांचे वाटप करण्यात आले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी