उदगीरला मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन
लातूर, 20 मार्च (हिं.स.) : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन येत्या १८ आणि १९ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


लातूर, 20 मार्च (हिं.स.) : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन येत्या १८ आणि १९ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष , माजी मंञी संजय बनसोडे सहस्वागतअध्यक्ष असतील.

पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तब्बल ८७ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन दर दोन वर्षांनी राज्यातील विविध भागांत आयोजित केले जाते. यापूर्वी रोहा, पिंपरी-चिंचवड, शेगाव आणि नांदेड येथे ही अधिवेशने यशस्वीरीत्या पार पडली आहेत. यंदाचे अधिवेशन उदगीर येथील स्वामी विवेकानंद शैक्षणीक संकुल येथे होत असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.अधिवेशनाच्या अनुषंगाने परिषदेच्या शिष्टमंडळाने स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि स्थानिक आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांना अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली. परिषदेची विनंती मान्य करत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, सातारा जिल्हाध्यक्ष हरीष पाटणे, लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे तसेच संयोजन समितीचे युवराज धोतरे यांचा समावेश होता.यंदाचे अधिवेशन वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळ्या स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार संयोजकांनी व्यक्त केला आहे. देशभरातील मान्यवर पत्रकारांना या अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात येणार असून सुमारे ३ हजार पत्रकार या सोहळ्यास उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या दृष्टीने निवास, भोजन, नोंदणी आणि इतर सर्व आवश्यक सुविधांची तयारी सुरू आहे.

अधिवेशन कार्यालयाचे उद्घाटनही नुकतेच मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते पार पडले. मराठी पत्रकारांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा सोहळा ठरणाऱ्या या राष्ट्रीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एस. एम. देशमुख, मिलिंद अष्टीवकर, किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभागीय सचिव तथा संयोजक सचिन शिवशेट्टे, संभाजीनगर विभागीय सचिव रवी उबाळे , संयोजन समितीच्या वतिने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande