
डोंबिवली, 20 मार्च (हिं.स.) :जळगाव जिल्ह्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका उज्ज्वला वाडेकर यांनी सुरू केलेल्या ‘भिंतीबाहेरील शाळा’ या अभिनव उपक्रमाचा आदर्श घेऊन डोंबिवलीतही विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्याची तयारी सुरू आहे.
डोंबिवलीतील आन्सर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक सचिन शेठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण दिल्यास ते अधिक प्रभावी ठरते. बाहेरील जगाची ओळख, विविध व्यवसायांची माहिती आणि तंत्रज्ञानाचे प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे ही काळाची गरज बनली आहे.ते पुढे म्हणाले की, डिजिटल युगात विद्यार्थ्यांना संगणक आणि संबंधित तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तसेच त्यातून व्यवहारज्ञान विकसित व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे. जरी सर्वसमावेशक तांत्रिक शिक्षण देणे शक्य नसले तरी प्राथमिक स्तरावर मार्गदर्शन नक्कीच केले जाईल.
दरम्यान, आन्सर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची दुसरी शाखा काटईजवळील वैभव नगरी परिसरात सुरू करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेले डोंबिवलीतील सतीश चाफेकर यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी वृत्तछायाचित्रकार बापू राऊत, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष अनिल हिरावट, सॅटरडे क्लबचे अध्यक्ष सुबोध पटवर्धन, तसेच झिम्माड कला साहित्य रसिक संस्थेच्या अध्यक्षा वृषाली विनायक आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi