नांदेडमध्ये शेतकरी व महिला बचत गटांसाठी कृषी अवजार बँक स्थापन प्रकल्प
नांदेड, 20 मार्च (हिं.स.) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना कृषी व्यवसायात भरारी घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत गावपातळीवर ‘कृषी अवजार
नांदेडमध्ये शेतकरी व महिला बचत गटांसाठी कृषी अवजार बँक स्थापन प्रकल्प


नांदेड, 20 मार्च (हिं.स.) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना कृषी व्यवसायात भरारी घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत गावपातळीवर ‘कृषी अवजार बँक’ स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्यांच्या ६० टक्के म्हणजेच कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयानुसार, प्रकल्पासाठी गावातील उमेद आणि माविम यांच्याद्वारे पुरस्कृत महिला बचतगट तसेच गाव संघ पात्र राहतील. लाभ घेण्यासाठी प्रत्येक गटात किमान १० सदस्य असणे आवश्यक आहे. यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतलेले गट अपात्र असतील. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास ऑनलाईन लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल, अशी सूचना कृषी विभागाने दिली आहे.

निवड झालेल्या गटांना गावस्तरावर कृषी अवजार बँक स्थापन करण्यासाठी ट्रॅक्टर चलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाइन हार्वेस्टर, फवारणी पंप यांसारखी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करता येईल. प्रकल्पाचे मूल्य २० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, राष्ट्रीयीकृत बँकेकडून ७५टक्के कर्ज घेणे बंधनकारक आहे.

अर्ज करण्यासाठी इच्छुक संस्थांनी प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर https://dbtndksp.mahapocra.gov.in/

५ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande