
सोलापूर, 20 मार्च, (हिं.स.)। सध्या मागणीच्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर मिळत नाही. तरीपण, शहरातील चौपाट्या, हॉटेलसह अन्य खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्या आढळतात. या पार्श्वभूमीवर अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी मागील तीन दिवसांत सोलापूर शहरातील विविध भागात छापेमारी करून ५५ पेक्षा अधिक टाक्या जप्त केल्या आहेत. त्या व्यावसायिकांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत.
सोलापूर शहरात जुना विजापूर नाका, चार हुतात्मा पुतळ्याजवळ, किल्ला बागेजवळ, सात रस्ता येथे खाद्यपदार्थांची विक्री करणारे हातगाडे खूप असतात. बहुतेक हातगाड्यांवर घरगुती गॅस सिलिंडरच दिसतो. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पाडोळे मैदानात उतरले आहेत. त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील चौपाट्यांवर छापे टाकून काही तासांत ४१ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड