रोप्य महोत्सवी वर्षात अकोलेकरांना दिलासा देणारे निर्णय घ्या – निलेश देव
अकोला, 20 मार्च (हिं.स.)। अकोला महानगरपालिकेच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात अकोलेकरांना प्रत्यक्ष दिलासा देणाऱ्या आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या योजना समाविष्ट कराव्यात, अशी ठाम व प्रभावी भूमिका वंचित बह
Photo


अकोला, 20 मार्च (हिं.स.)।

अकोला महानगरपालिकेच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात अकोलेकरांना प्रत्यक्ष दिलासा देणाऱ्या आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या योजना समाविष्ट कराव्यात, अशी ठाम व प्रभावी भूमिका वंचित बहुजन आघाडी गटनेता तथा स्थायी समिती सदस्य निलेश देव यांनी आज स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत मांडली.

यावेळी निलेश देव यांनी स्पष्टपणे नमूद केले की, अकोला महानगरपालिकेला २५ वर्षे पूर्ण होत असताना हा केवळ उत्सवाचा क्षण नसून अकोलेकरांना दिलासा देण्याची ही ऐतिहासिक संधी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न चिघळलेला असून तो रोप्य महोत्सवी वर्षात मार्गी लावण्यासाठी सरासरी १००० रुपयांमध्ये तडजोड योजना जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी ज्या घरांची मालमत्ता महिलांच्या नावावर आहे अशा घरांना मालमत्ता करात पूर्ण माफी किंवा विशेष सवलत द्यावी, अशी महत्त्वाची मागणीही त्यांनी केली. पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सौरऊर्जा (सोलर पॅनल) वापरणाऱ्या घरांना मालमत्ता करात विशेष सवलत देण्याची योजना लागू करण्याचीही सूचना त्यांनी मांडली.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा सन्मान राखण्यासाठी पत्रकार बांधवांना मालमत्ता करात माफी देण्याचा निर्णय घ्यावा, तसेच शहर स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी घंटागाडी शुल्क माफ करण्याची योजना जाहीर करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

यासोबतच अकोला शहराच्या मूलभूत गरजांकडे लक्ष वेधत अकोलेकरांना स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर आणि सक्षम विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देणारे अकोला घडविण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

दरम्यान, शहराच्या इतिहास व प्रेरणादायी वारशाचे जतन करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानींच्या छायाचित्रांचा अमूल्य वारसा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, अशी मागणीही निलेश देव यांनी बैठकीत केली. “स्पंदने स्वातंत्र्याची” या उपक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सेनानींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व त्यांच्या जीवनकार्याचे दस्तऐवजीकरण करून ते विद्यार्थ्यांपर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

रोप्य महोत्सवी वर्षात अकोलेकरांना दिलासा देणाऱ्या योजना, शहराच्या विकासाला चालना देणारे निर्णय आणि स्वातंत्र्य सेनानींच्या वारशाचे जतन करणाऱ्या उपक्रमांचा समावेश अर्थसंकल्पात व्हावा, अशी ठाम अपेक्षा निलेश देव यांनी यावेळी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande