
अकोला, 20 मार्च (हिं.स.)।
स्थानिक उद्योजकांना सक्षम व्यासपीठ मिळावे आणि नागरिकांना दर्जेदार उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता यावीत, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
राज्यातील विविध शहरांमध्ये यशस्वी ठरलेल्या या उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून २८ व २९ मार्च २०२६ रोजी अकोल्यात ही विशेष बाजारपेठ भरविण्यात येणार आहे.
अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून, स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. ‘अमृतपेठ’ हा त्याच प्रयत्नांचा एक प्रभावी भाग असून, या माध्यमातून स्थानिक उत्पादक आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
या विशेष बाजारपेठेत नागरिकांना विविध प्रकारचे आकर्षक स्टॉल्स पाहायला मिळणार आहेत. स्वादिष्ट खाद्यपदार्थ, ट्रेंडी व पारंपरिक कपडे, घरगुती उपयोगाच्या वस्तू, कलात्मक हस्तकला, दागदागिने तसेच अनेक स्वदेशी उत्पादनांचा समावेश या प्रदर्शनात असेल. त्यामुळे खरेदीप्रेमींसाठी हा एक वेगळाच आणि आनंददायी अनुभव ठरणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक उद्योजकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा आहे.
विशेष म्हणजे, या उपक्रमासोबतच मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय, अकोला यांच्या अंतर्गत मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नामांकित तज्ज्ञ डॉक्टर चा मार्फत नागरिकांना सेवा देणार आहेत. शुक्ल हॉस्पिटलचे डॉ. शुक्ल सर(बालरोग तज्ञ) आणि डॉ दिपाली शुक्ल मॅडम (स्त्री रोग तज्ञ) , वत्सल हॉस्पिटलचे डॉ. भागवत सर(न्यूरोसर्जन), समर्पण हॉस्पिटलचे डॉ. तुळजापुरे सर(जनरल सर्जन), सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. राठी सर(अस्थिरोग तज्ञ), बगाडिया हॉस्पिटलचे डॉ. बगडिया सर(कर्करोग तज्ञ) , होप हॉस्पिटलच्या डॉ. मंत्री मॅडम(नेत्ररोग तज्ञ) तसेच सोलर हॉस्पिटलचे डॉ. केसान सर(पेडाट्रिक सर्जन) हे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होऊन नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करणार आहेत. त्यामुळे या उपक्रमाला सामाजिक आणि आरोग्यदायी असे दुहेरी महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमृत संस्थेचे अकोला जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुळकर्णी यांनी नागरिक व उद्योजकांना आवाहन केले आहे की, स्थानिक उत्पादकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत आपला व्यवसाय विस्तारावा. तसेच नागरिकांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक लघुउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे आणि खरेदीचा आनंद घ्यावा.
‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ २०२६’ हा उपक्रम केवळ एक प्रदर्शन नसून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा, स्वदेशी उत्पादनांना नवी ओळख देणारा आणि अकोल्यातील उद्योजकतेला नवी दिशा देणारा एक प्रेरणादायी उत्सव ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे