
अकोला, 20 मार्च (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याचे काम सुरू झाल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थांनी या कारवाईला तीव्र विरोध करत पुतळा हटविण्याचे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पुतळा हटविण्यासाठी कोणताही स्पष्ट आदेश किंवा अधिकृत कागदपत्रे दाखवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाकडून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा नूतनीकरण करून त्याच ठिकाणी पुन्हा बसवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पुतळा हटविण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे