
चंद्रपूर, 20 मार्च, (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समितीची अर्थसंकल्पीय सभा स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी आयुक्त अकुनुरी नरेश यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा सन २०२५-२६ चा सुधारित तसेच सन २०२६-२७ चा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला.
चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समितीची अर्थसंकल्पीय सभेत स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. यावेळी सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, शहराचा सर्वांगीण विकास साधणे तसेच आर्थिक शिस्त राखणे या उद्दिष्टांवर विशेष भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावर सदस्यांनी मुद्देनिहाय सखोल चर्चा करत विविध सूचनाही मांडल्या.
स्थायी समितीपुढे सादर केलेला अर्थसंकल्प सदस्यांच्या सूचना व आवश्यक बदल विचारात घेऊन महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
बैठकीत स्थायी समिती सदस्यांनी नगरसेवकांना दिला जाणारा ५ लाख रुपयांचा स्वेच्छा निधी (नगरसेवक विकास निधी) वाढवून २० लाख रुपये करण्याची मागणी केली. मात्र, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता सभापतींनी तो निधी ७.५० लाख रुपये करण्यास मंजुरी दिली.
मालमत्तांना गुंठेवारी अधिनियमांतर्गत नियमानुसार करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी तसेच प्राप्त अर्जांना तात्काळ मंजुरी देण्याच्या दृष्टीने दर महिन्याला बैठक घेण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय, मनपाच्या इमारती व गाळ्यांच्या भाडेदराचे २०१८ पासून फेरमूल्यांकन झाले नसल्याने हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातील चौक सौंदर्यीकरण व पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी निधीत वाढ करण्याची मागणी सदस्यांनी केली. तसेच रुग्णवाहिका व शववाहिका सेवा केवळ इंधन खर्चावर नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याप्रसंगी सर्व स्थायी समिती सदस्य,उपायुक्त संदीप चिद्रवार, मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, शहर अभियंता रवींद्र हजारे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव