
नाशिक, 20 मार्च (हिं.स.)।
सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण यांच्या वतीने २२ मार्च (जागतिक जल दिन) रोजी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर ‘स्वच्छ ब्रह्मगिरी अभियान’ राबविण्यात येणार आहे. गोदावरी नदीच्या उगमस्थानी असलेल्या या पवित्र स्थळाचे संवर्धन आणि स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
धार्मिक तसेच पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर दररोज मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटकांची वर्दळ असते. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त परिसर आणि निसर्गाप्रती जबाबदार वर्तन यासाठी जनजागृती करणे आवश्यक ठरत आहे. त्याच अनुषंगाने हे अभियान आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी ७ ते ११ या वेळेत होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, ट्रेकिंग गट, सामाजिक संस्था, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, स्थानिक नागरिक तसेच वन विभाग, सत्संग फाउंडेशन, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, आखाडे, पुरोहित संघ आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकारीही सहभागी होणार आहेत.
या मोहिमेअंतर्गत ‘पास द वेस्ट’ या संकल्पनेवर आधारित ‘क्लीन ट्रेल चॅलेंज’ राबविण्यात येणार असून सहभागी ट्रेकिंग मार्गांवर कचरा गोळा करत एकमेकांकडे प्रतीकात्मकरीत्या कचऱ्याच्या पिशव्या सुपूर्द करतील. तसेच ‘प्लॉगाथॉन वॉक’च्या माध्यमातून चालत-चालत प्लास्टिक, पॅकेजिंग कचरा आणि इतर न विघटनशील कचरा संकलित करण्यात येईल. संकलित कचऱ्याचे ओले, सुके आणि घातक अशा प्रकारांमध्ये वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
यासोबतच ‘#PlogForBrahmagiri’ आणि ‘#CleanKumbh2027’ या हॅशटॅगद्वारे ‘बिफोर-अँड-आफ्टर’ व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून या उपक्रमाचा व्यापक प्रसार करण्यात येणार असून नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “ब्रह्मगिरी हे केवळ धार्मिक स्थळ नसून आपल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. कुंभमेळा २०२७च्या तयारीत स्वच्छता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. या अभियानातून स्वच्छतेबाबत जनचळवळ निर्माण व्हावी आणि प्रत्येक भाविकाने स्वच्छतेचा संकल्प करावा, ही अपेक्षा आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV