
परभणी, 20 मार्च (हिं.स.)।
कुख्यात ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्याशी कथित संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी परभणीतील संतप्त महिलांनी केली आहे. यासंदर्भात राज्यपालांना उद्देशून जिल्हाधिकारी मार्फत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शेकडो महिला व मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात याच्याशी आयोगाच्या अध्यक्षा यांचे संबंध असल्याच्या बातम्या समोर येत असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली सखोल न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. कॉ. अॅड. माधुरी क्षीरसागर, हेमाताई रसाळ, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. अंबीका डहाळे, लक्ष्मी लहाणे, अनिता धोंडगे, संगीता चट्टे, निर्मला कसारे, संतोषी देवके, छाया जावळे, वंदना कदम व श्रीमती दुर्राणी आदी महिलांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी हे निवेदन सादर केले. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, राज्य महिला आयोग ही महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणारी अर्धन्यायिक व वैधानिक संस्था असून महिलांवरील अत्याचार रोखणे, त्यांच्या समस्या सोडवणे व सक्षमीकरणासाठी कार्य करते. 25 डिसेंबर 1993 रोजी स्थापन झालेल्या या आयोगाकडून समाजात न्याय व समानतेची अपेक्षा असताना अशा प्रकारच्या आरोपांमुळे संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात संबंधित राजकीय व्यक्ती, अधिकारी व इतर हितसंबंधींचीही चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी ठाम भूमिका संतप्त महिलांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis