
रत्नागिरी, 20 मार्च, (हिं. स.) : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव येत्या बुधवार आणि गुरुवारी (दि. २५-२६ मार्च) रत्नागिरीत होणार आहे.
ग्रंथोत्सवाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कुवारबाव येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात होईल. लांजा येथील ज्येष्ठ साहित्यिक अॅड. विलास कुवळेकर उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. सन्माननीय लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथोत्सवात विविध विषयांवर व्याख्याने, परिसंवाद व काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शन व ग्रंथ विक्रीसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये शासकीय ग्रंथागार, साहित्य अकादमी, दिल्ली व मुंबई, नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली व मुंबई, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, कोल्हापूर शाखा आणि पुण्यातील प्रकाशक व विक्रेते यांची ग्रंथ दालने लावण्यात येणार असून, या ग्रंथ प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे उद्घाटन ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी होणार आहे. ग्रंथोत्सवाच्या सुरुवातीस सकाळी 8.30 वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथदिंडीचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने होणार आहे. ग्रंथ दिंडीचा मार्ग मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल येथून सामाजिक न्याय भवन मार्गे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय असा असेल.
बुधवारी, 25 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता “सर्जनशीलतेची गुरुकिल्ली : वाचन या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले असून राजापूरचे ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी त्याचे अध्यक्ष असून डी. जी. के. महाविद्यालयाच्या सहप्राध्यापक श्रीमती वसुंधरा जाधव आणि कोकण विभाग ग्रंथालय संघाचे संचालक राकेश आंबेरकर हे वक्ते सहभागी होणार आहेत. दुपारी 3 वाजता 'अहिल्याबाई होळकर : स्त्री नेतृत्वाची अभिजात परंपरा' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संचालक अभिजित हेगशेट्ये हे आहेत. साहित्यिक माधव अंकलगे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, चिपळूणच्या संचालिका प्राची जोशी हे वक्ते सहभागी होणार आहेत.
गुरुवारी, 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थी वर्ग, वाचक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी “यशाच्या दिशेने : स्पर्धा परीक्षेची स्मार्ट तयारी” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये जिल्हा कोषागार अधिकारी प्रवींद बिरादार आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल किरण धांडोरे सहभागी होणार आहेत. दुपारी 2 वाजता निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन व त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होईल. ज्येष्ठ कवयित्री श्रीमती सुनेत्रा जोशी या काव्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवितील.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी