
अमरावती, 20 मार्च (हिं.स.) | बिअरबार ऍड रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या नेतृत्वातील पथकाने या हॉटेलविरुद्ध कारवाईचा बडगा उगारत हॉटेल मालकाविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कठोरा नाका परिसरातील शाल रेस्टॉरंट अँड बार येथे घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर करण्यात येत असल्याचे तपासणीत आढळून आले.
जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी प्रवीण उत्तमराव राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित हॉटेलमध्ये तपासणी करण्यात आली. यावेळी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या सिलिंडरऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर अन्न शिजविण्यासाठी केला जात असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान दोन घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यामध्ये अनुक्रमे पाच किलो व चार किलो गॅस शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. जप्त केलेल्या सिलिंडरची अंदाजे किंमत पाच हजार रुपये आहे. हे सिलिंडर शासकीय धान्य गोदामात जमा करण्यात आले. याप्रकरणी हॉटेलचे मालक वीरेंद्र भीमराव शहारे (रा. विद्युत कॉलनी, अमरावती) यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम तीन व सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी