
अमरावती, 20 मार्च (हिं.स.)। वाढत्या तापमानाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा केवळ सकाळच्याच सत्रात भरवण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे पत्र मुख्याध्यापकांना पाठवले आहे. सोमवार पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. परंतु त्याचवेळी काही खासगी शाळांना या आदेशाची अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही. असेही वास्तव पुढे आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काहीशी कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित शाळांनी पर्यायी व्यवस्था करावी. असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याहीपुढे जाऊन ज्या शाळांची अडचण आहे, त्या शाळांचे मुख्याध्यापक आणि जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढला जाण्याची शक्यतादेखील निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सुमारे १५०० शाळांचे जिल्हा परिषदेचे जाळे आहे. या शाळांमधून सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांची शाळा सोमवार पासून दुपारच्या सत्रात भरणार नाही.
शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यासाठी दोन जि.प. च्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात दोन वेगवेगळ्या वेळा सूचविण्यात आल्या आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जारी केलेल्या पत्रात शाळेची वेळ सकाळी ७ ते ११ अशी निर्धारीत केली आहे. त्याचवेळी प्राथमिक विभागाच्या पत्रातील वेळ ७.१५ ते १२.१५ अशी लिहिण्यात आली आहे. येत्या काळात या मुद्द्यावर वाद होऊ शकतो. त्यामुळे सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळांची वेळ सकाळी ७ ते ११अशीच असायला पाहीजे, असे संघटनांचे म्हणणे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी