
भाविक व शेतकऱ्यांसाठी सुविधा प्रकल्पाचा शुभारंभ
नांदेड, 20 मार्च (हिं.स.) । देश व राज्य पातळीवर पायाभूत सुविधा मजबूत करण्यासह नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून ठोस व धोरणात्मक निर्णय घेतले जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले. ते माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रात उभारण्यात येणाऱ्या शक्तिपीठ बंधाऱ्याच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी बोलत होते.
भूमिपूजन दीक्षागुरू प्रेमसिंगजी (बापू) महाराज यांच्या हस्ते पार पडले.
सोहळ्यात आमदार भीमराव केराम, बाबुराव कोहळीकर, किसनराव वानखेडे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव आणि धरमसिंग राठोड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंत्री राठोड यांनी सांगितले की, माहूर गडावर दरवर्षी लाखो भाविक येतात व पैनगंगा नदीत स्नान करतात; मात्र आवश्यक सुविधा अपुऱ्या होत्या. शक्तिपीठ बंधाऱ्याच्या माध्यमातून भाविकांना स्नान घाट, रेलिंग, प्रकाश व्यवस्था, संरक्षण भिंत, पार्किंग व सभामंडप यांसारख्या सुविधा उपलब्ध होणार असून प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, विकासकामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार भीमराव केराम म्हणाले की, प्रेमसिंगजी (बापू) महाराज यांनी विनामोबदला जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
मतदारसंघात सुमारे 1,100 कोटी रुपयांच्या निधीतून तीन उच्च पातळी बंधारे उभारले जात असून त्यातील सर्वात मोठा प्रकल्प किनवट-माहूर मतदारसंघात सुरू आहे. धनोडा उच्च पातळी बंधारा पूर्ण झाल्यानंतर माहूर येथील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होईल.
याशिवाय, सहस्त्रकुंड प्रकल्प मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, या प्रकल्पाद्वारे सुमारे 22,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती मंत्री राठोड यांनी दिली.
----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis