कचरामुक्त अमरावतीसाठी महापौरांचे कडक निर्देश
अमरावती, 20 मार्च (हिं.स.) । अमरावती शहर कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने स्वच्छता व्यवस्थेवर अधिक कडक भूमिका घेत पुढील टप्प्यातील कार्यवाहीला सुरुवात केली आहे. स्वच्छतेच्या कामात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट
निरीक्षक-कंत्राटदार समन्वयावर भर; कचरामुक्त अमरावतीसाठी महापौरांचे कडक निर्देश


अमरावती, 20 मार्च (हिं.स.) । अमरावती शहर कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने स्वच्छता व्यवस्थेवर अधिक कडक भूमिका घेत पुढील टप्प्यातील कार्यवाहीला सुरुवात केली आहे. स्वच्छतेच्या कामात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी स्वच्छता निरीक्षक व कंत्राटदारांनी समन्वय ठेवून जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत शहरातील कचरा संकलन व्यवस्था, उपलब्ध मनुष्यबळ, यंत्रसामुग्री आणि नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरातील कचऱ्याची समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी स्वच्छता निरीक्षकांनी क्षेत्रनिहाय नियंत्रण ठेवणे आणि कंत्राटदारांनी करारानुसार काम काटेकोरपणे पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.निरीक्षकांनी नियमित पाहणी करून कचरा संकलन वेळेवर होत आहे की नाही याची खात्री करावी, तसेच कंत्राटदारांनी आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्री उपलब्ध करून कामात कोणतीही त्रुटी राहू देऊ नये, असे निर्देश देण्यात आले. वाढत्या कचरा समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त घंटागाड्या, कचरा संकलन वाहने आणि आधुनिक स्वच्छता उपकरणे वाढवण्याबाबतही संबंधित कंत्राटदारांना सूचना देण्यात आल्या.स्वच्छता व्यवस्थेवर नियंत्रण मजबूत करण्यासाठी झोननिहाय जबाबदारी निश्चित करून नियमित आढावा बैठक, क्षेत्रीय पाहणी आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्रिय करण्याचा निर्णयही घेण्यात आला. “स्वच्छ अमरावती हे केवळ उद्दिष्ट नसून प्रशासनाची बांधिलकी आहे. निरीक्षक, कंत्राटदार आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच शहर स्वच्छ व सुंदर बनेल,” असे महापौरांनी नमूद केले.दरम्यान, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, ओला-सुका कचरा वेगळा देणे आणि स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. बैठकीस महानगरपालिका अधिकारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी, स्वास्थ निरीक्षक, कंत्राटदार प्रतिनिधी आणि झोन स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. आगामी काळात अमरावती स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श शहर बनवण्यासाठी अधिक कठोर आणि नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande