कोल्हापुरात दोन शासकीय कार्यालयात रंगले वसुली युद्ध : इमारती केल्या सील
कोल्हापूर, 20 मार्च (हिं.स.)। कोल्हापूर महानगरपालिकेकडे असलेली थकीत तब्बल 180 कोटींच्या पाणीपट्टी वसुलीसाठी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने आज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा पंपिंग स्टेशन मधील पाणीपुरवठा बंद करून ही इमारत सिल केली.
वसुलीसाठी कार्यालये सिलिंगची कारवाई


कोल्हापूर, 20 मार्च (हिं.स.)।

कोल्हापूर महानगरपालिकेकडे असलेली थकीत तब्बल 180 कोटींच्या पाणीपट्टी वसुलीसाठी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने आज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा पंपिंग स्टेशन मधील पाणीपुरवठा बंद करून ही इमारत सिल केली. पाटबंधारे विभागाचे अधिकारी कारवाईसाठी बालिंगा पम्पिंग स्टेशन येथे आले असता या ठिकाणी महापालिकेचा एकही कर्मचारी हजर नव्हता आणि पम्पिंग स्टेशनला बाहेरून कुलूप होते. हे कुलूप तोडून अधिकाऱ्यांनी आतील पंपाचे मेन स्विच बंद करून इमारत सील केली. तर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागानेही पाटबंधारे विभागाकडे असलेल्या थकीत घरफाळा आणि पाणीपट्टी वसुलीसाठी ताराबाई पार्क येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातील कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून इमारत सील केली. दोन्ही खात्याकडून एकमेकांकडे असलेल्या देय रक्कमेबाबत हरकती असल्याने थकीत असलेली रक्कम भरली गेली नाही. पण मार्चअखेर वसुली करण्याच्या उद्देशाने प्रथम पाटबंधारे विभागाकडून कारवाई झाल्यानंतर महापालिकेकडून ही प्रतिकारवाई केल्याने शहरातील दोन शासकीय कार्यालयाचे वसुली युद्ध रंगले.

याबाबत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता माने यांनी सांगितले की कोल्हापूर महानगरपालिकेकडे 2011 पासून 2026 पर्यंत तब्बल 180 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यातील 66 कोटी निव्वळ पाणीपट्टी आणि इतर स्थानिक कर असे 80 कोटी थकबाकी आहे. बाकी रक्कम दंडणीय आहे. महानगरपालिकेकडून वर्षाला 25 कोटी भरणे अपेक्षित असताना केवळ अडीच कोटी रुपये भरले जातात. 2024 मध्ये सहा कोटी रुपयेच्या दरम्यान भरले होते. तर यावर्षी 6 कोटी 40 लाख रुपये भरले. तेही मंत्रालयात आ. अमल महाडिक यांच्या प्रयत्नाने पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेतली त्यावेळी किमान दहा कोटी रुपये महापालिकेने भरावे लागतील असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले होते. तरीही महापालिकेने केवळ 6 कोटी 40 लाख रुपये भरले. म्हणून आम्हाला ही कारवाई करावी लागली. यामध्ये शहराचा पाणीपुरवठा बंद व्हावा असा आमचा हेतू नाही. म्हणूनच आमच्याकडून वेळोवेळी महानगरपालिकेला सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच रीतसर नोटीस देण्यात आली होती. पण महापालिकेने त्याची दखल घेतली नाही. यामुळे पाणीपट्टी वसुलीसाठी बालिंगेसह शिंगणापूर आणि काळम्मावाडी पंपिंग स्टेशन ही बंद करावे लागेल. असेही त्यांनी सांगितले.

पाटबंधारे विभागाच्या या कारवाईला प्रतिउत्तर म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाने ही पाटबंधारे विभागाचे ताराबाई पार्क येथील कार्यालयाची इमारत सील केली. यासाठी या कार्यालयाकडे असलेली महानगरपालिकेची घरफाळा आणि पाणीपट्टी थकीत असल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या पथकाने पाटबंधारे विभागातील कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना तेथील लाईट, पंखे, संगणक आदी बंद करायला सांगून त्यांना बाहेर काढले. आणि त्यानंतर ही इमारत सील केली. यानंतर महापौर रूपाराणी निकम यांनी महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता माने यांचे सह दोन्ही खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande