
सोलापूर, 20 मार्च, (हिं.स.)। पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी धारधार होताना पाहायला मिळत आहे. पालकमंत्री गोरे यांनी मोहिते-पाटील यांचे नाव न घेता त्यांना पुन्हा डिवचले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ करू, असे म्हणणाऱ्यांचाच जनतेने सुपडासाफ केला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्थापनेपासून पहिल्यादांच ऐतिहासिक असा भाजपला विजय मिळाल्याचे गोरे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या सभेनंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सदस्यांशी बोलताना पालकमंत्री गोरेंनी अनेक विषयांवर राजकीय भाष्य केले. खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचारादरम्यान पालकमंत्री गोरे व भाजपचा सुपडासाफ करू, अशी राजकीय घोषणा केली होती. त्याला प्रत्युत्तर पालकमंत्री गोरे यांनी आपल्या भाषणातून दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड