
जळगाव, 20 मार्च (हिं.स.) जळगाव लोकसभा क्षेत्रातील रेल्वे वेळापत्रकातील बदलांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींचा मुद्दा खासदार स्मिता वाघ यांनी संसदेत मांडला. विशेषतः सूरत-भुसावळ (१९००५) आणि देवळाली-भुसावळ एक्सप्रेस (११११३) या गाड्यांच्या वेळेत झालेल्या बदलांमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.खासदार वाघ यांनी या गाड्यांचे वेळापत्रक तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली. तसेच, उधना-पुणे दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची गरजही त्यांनी लक्षात आणली. लोकसभेतील चर्चेनंतर खासदार स्मिता वाघ यांनी नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या बैठकीत उधना–पुणे एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव प्रमुख मुद्दा त्यांच्याकडून मांडण्यात आला.यावेळी पाचोरा येथे विदर्भ एक्सप्रेस आणि चाळीसगाव येथे कर्नाटक एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी देखील त्यांनी केली. जळगावसह चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर आणि धरणगाव परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, कर्मचारी आणि शेतकरी वर्गाला भेडसावणाऱ्या अडचणींचीही त्यांनी सविस्तर माहिती मंत्र्यांना दिली. रेल्वे मंत्र्यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शवित लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रेल्वे सुविधांमध्ये लवकरच सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर