
नाशिक, 20 मार्च (हिं.स.)।
: सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने एकात्मिक वाहतूक नियोजन आणि माहिती (डेटा) समन्वयासाठी शुक्रवारी कार्यशाळेचे आयोजन केले. नाशिक स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेला कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेत नाशिक महानगरपालिका, पोलीस विभाग, महा मेट्रो, रेल्वे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्मार्ट सिटी, जिल्हा प्रशासन आदी विभागांचा सहभाग होता. यावेळी सिटी लिंकचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोधले, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जिल्हा परिवहन अधिकारी किरण भोसले, त्र्यंबक नगरपरिषद अभियंता स्वप्नील काकड, नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, कुंभ नाशिक शहर पोलीस निरीक्षक एस. के. मचारे, कुंभमेळा प्राधिकरणाचे तहसीलदार मकरंद दिवाकर तसेच MSIDC, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा (सिंचन) विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कुंभमेळ्यादरम्यान वाहतूक व गर्दी व्यवस्थापन प्रभावी करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या माहितीची ओळख आणि संकलन यावर कार्यशाळेत भर देण्यात आला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) नागपूरचे तज्ज्ञ या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
विभागांकडून GIS आधारित रस्ते जाळे, चौकांची रचना, सार्वजनिक वाहतूक मार्ग, पार्किंग व्यवस्था, सिग्नल प्रणाली तसेच रामकुंड आणि प्रमुख घाटांची माहिती सादर करण्यात आली. पावसाळ्यात प्रत्यक्ष वापरता येणाऱ्या घाट क्षेत्रांच्या आकलनावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
सर्व विभागांनी आपापली संबंधित माहिती एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानंतर प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.
यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “सिंहस्थ कुंभमेळा २०२७साठी एकात्मिक वाहतूक नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. विभागांमधील समन्वय आणि माहिती आधारित नियोजनामुळे भाविकांसाठी सुरक्षित आणि सुलभ व्यवस्था उभारणे शक्य होईल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV