


रायगड, 20 मार्च (हिं.स.)। : महाड सत्याग्रहाचा या ऐतिहासिक लढ्याच्या शताब्दी वर्षाला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. Dr. B. R. Ambedkar यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील Chavdar Tale येथील पाणी प्राशन करून अस्पृश्यतेविरुद्ध निर्णायक लढा उभारला होता. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस ‘चवदार तळे क्रांती दिन’ म्हणून साजरा केला जातो.
शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त महाड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक समता, मानवाधिकार आणि बंधुत्वाचा संदेश देणारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी चवदार तळे जल शुद्धीकरण प्रकल्प तसेच परिसर सुशोभिकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रायगडची भूमी ही स्वराज्य आणि समतेचा संदेश देणारी पवित्र भूमी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संदेश दिला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे सत्याग्रहातून समतेचा संदेश दिला. हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर तो मानवाच्या स्वाभिमानासाठीचा लढा होता.
यंदाचे वर्ष महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीचे, गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीचे आणि चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे असल्याने महाराष्ट्र शासनाने हे वर्ष ‘समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
तसेच, समाजातील विषमता आणि जातीय भेदभाव यामुळे देशाला गुलामगिरीला सामोरे जावे लागले, याची जाणीव करून देत समतेकडे जाण्याचा मार्ग समरसतेतूनच जातो, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, चवदार तळे सत्याग्रह हा भारताच्या इतिहासातील निर्णायक टप्पा ठरला असून या आंदोलनामुळे सर्वांसाठी सार्वजनिक पाणवठे खुले झाले, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.शताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाड येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असून, सामाजिक न्यायाच्या चळवळीला नवचैतन्य देणारा हा ऐतिहासिक सोहळा ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)