
सोलापूर, 20 मार्च (हिं.स.)। एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत मंगळवार आणि गुरुवारी तहसीलदार मदन जाधव हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाऊन महसूल विषयक असलेले प्रश्न समजून घेत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महसूलच्या समस्या यामुळे सुटू लागल्याने महसूल प्रशासन सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.
शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी व महिला, निराधार व्यक्तीचा सर्वात जास्त संपर्क तहसील कार्यालयास येत असतो. त्यामध्ये वयोवृद्ध, भूमीहीन तसेच निराधार महिलांसाठी संजय गांधी योजनेचा लाभ, शिधापत्रिका व धान्यासाठी पुरवठा विभाग, नक्कल विभाग, निवडणुक संदर्भातील कामकाज देखील महसूलकडे असल्याने तालुक्यातील सर्वाधिक कामाचा ताण हा महसूल विभागाकडे येत असतो.या सर्व धावपळीत काही कामे देखील प्रलंबित राहत असतात परंतु महसूल विभागाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर घेण्याचे निश्चित केल्यामुळे सध्या या शिबिरामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न तत्काळ व जागेवर सुटू लागले.
महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ घेण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात केल्यामुळे महसूलचे अधिकारी तालुक्यातील आठ मंडळसह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात दौरे करून शेतकरी,नागरिकांच्या महसूलच्या समस्येच्या निपटारा करण्यासाठी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन करीत असून स्वत तहसीलदार मदन जाधव हे देखील एसी दालनाच्या बाहेर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधून अडचणीचे निराकरण करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड