
जळगाव , 20 मार्च, (हिं.स.) - तालुक्यातील निमखेडी येथे एका पतीनेच आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. दिपाली नितीन सोनवणे असं मृत महिलेचं नाव असून, नितीन सोनवणे असं आरोपी पतीचं नाव आहे. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणारा नितीन आपल्या पत्नी दिपाली, दोन मुलं आणि एका मुलीसोबत राहत होता. मात्र, मागील काही वर्षांपासून त्यांच्या संसारात सतत वाद सुरू होते. मागील चार वर्षांपासून पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत होती. दोघं अनेक वेळा वेगळं राहिले होते. दिपाली ही अनेकदा घर सोडून जायची, त्यामुळे दोघांमधील वाद अधिकच वाढत गेले.
पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. वाद इतका वाढला की, त्याचं रूपांतर झटापटीत झालं. संतापाच्या भरात नितीन सोनवणे याने आपला ताबा गमावला आणि अत्यंत टोकाचं पाऊल उचललं.त्याने आधी दिपालीच्या डोक्यावर विटांनी हल्ला केला आणि त्यानंतर लोखंडी विळ्याने तिच्या मानेवर आणि पोटावर वार करत तिची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यानंतर दिपाली घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपी नितीन सोनवणे स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गेला. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि दिपालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर