
रत्नागिरी, 20 मार्च, (हिं. स.) : विद्यार्थी युवकांना संसदीय आणि विधिमंडळीय कामकाजाची ओळख व्हावी, त्यांच्यातील वादविवाद, वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्य विकसित व्हावे, या हेतूने युवक बिरादरी (भारत) या संस्थेने मुंबईत आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा संसदेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थिनी जान्हवी जोशी हिने सहभाग घेतला,
युवक बिरादरी (भारत) ही महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून क्रांती शहा यांनी १९७४ मध्ये स्थापन केलेली मुंबईतील राष्ट्रीय पातळीवरील संस्था असून, तरुण वर्गात लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणे, युवकांमधील सुप्त गुण विकसित करणे, सामाजिक आणि राष्ट्रीय बांधणीत तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी या संस्थेतर्फे अभिरूप युवा संसद, युवा भूषण आणि स्मृती वाचन स्पर्धा, युवा शिबिरे, समुदाय विकास कार्यक्रम, पर्यावरण संरक्षण अशा विविध सामाजिक– शैक्षणिक –सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन देशभरात करण्यात येते.
गेल्या जानेवारीत राज्यशास्त्र विभाग आणि युवक बिरादरीच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय अभिरूप युवा संसद कार्यशाळा घेण्यात आली होती. दोन सत्रात पार पडलेल्या या कार्यशाळेत युवक बिरादरीचे कार्यकारी समन्वयक अॅड. वेदांत माईणकर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राजकीय व्यवस्था, संसदीय कार्यप्रणाली, संसदीय कामकाजातील संकल्पना यावर सैद्धांतिक स्वरूपात आणि संचालक प्रा. नागेंद्र राय यांनी विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून संसदीय कामकाजाचे सादरीकरण करून घेतले. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध समकालीन घडामोडींवर विचारमंथन केले. विद्यार्थ्यांना आयत्या वेळी देण्यात आलेल्या विषयावरील मतप्रदर्शनानंतर तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी कु. ओंकार आठवले आणि कु. जान्हवी जोशी यांची पुढील फेरीकरिता निवड करण्यात आली. या दोन्ही विजेत्या स्पर्धकांना युवक बिरादरीतर्फे पाच हजाराचे परितोषिक देण्यात आले.
प्राथमिक फेरीनंतर पार पडलेल्या विविध फेऱ्यांमधून जान्हवी जोशीची महाराष्ट्रसह देशातील सुमारे दोन हजार स्पर्धकांमधून मुंबईतील अंतिम फेरीसाठी २८ स्पर्धकांमध्ये निवड झाली होती. अंतिम राष्ट्रीय अभिरूप युवा संसदेत तिने सादरीकरण केले. या अंतिम फेरीत विद्यार्थांना चर्चेसाठी सत्ता समतोल : केंद्र-राज्य संबंधांवर पुनर्विचार, कर्तव्य विधेयक- २०२६ असे विषय देण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, न्या. साधना गोरे (मुंबई उच्च न्यायालय), डॉ. राजन वेळूकर (माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ), प्रा. हुबनाथ पांडे, डॉ. मृदुल निळे, श्री. अविनाश सणस (उपायुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग) यांनी केले. यावेळी तैपेई इकोनॉमिक अॅन्ड कल्चरल सेंटरचे उपसंचालक विल्यम जे. एस. वांग यांची विशेष उपस्थिती होती. अंतिम स्पर्धेत पंजाबच्या होशियारपूर येथील दिव्या मेनन यांनी प्रथम क्रमांक, तर महाराष्ट्र राज्यातील सर्वेश नायक यांनी द्वितीय आणि मधु सिंग यांनी तृतीय क्रमांक पटकावला. जान्हवी जोशीला उत्तेजनार्थ दहा हजाराचे पारितोषिक आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी